भोकरमध्ये इनामी जमीन घोटाळा प्रकरण पेटले
भूमाफिया कडून ब्लॅकमेलिंग होत असल्याची तक्रार
भोकर (अनिल डोईफोडे) येथील इनामी जमीन गट नंबर २६२ शासन आदेशान्वये गावठाणमध्ये रूपांतरित करण्यात आली असताना सदरील जमीन सातबारावर गावठाणची नोंद न केल्यामुळे भूमाफिया कडून ब्लॅकमेलिंग होत असल्याची तक्रार ५० ते ६० नागरिकांनी भोकरचे तहसीलदार व पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.
भोकरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून इनामी जमीन खरेदी-विक्रीचा प्रकार चालू आहे. गेल्या ६० ते ७० वर्षांपासून अनेक नागरिकांनी जमीन खरेदी करून पक्की घरे बांधलेली आहेत. यामध्ये भोकरचे तहसील कार्यालय पण आहे. अनेक नागरिकांकडे कमर्शियल एन.ए. पण झाले आहे.
शासकीय नियमानुसार पी.आर. कार्ड असलेल्या गट नंबरचा सातबारा रद्द करण्याचा शासकीय नियम आहे. पण गट नंबर २६२ चा सातबारा काही कारणास्तव रद्द झालेला नाही. सातबारा वर गावठाणची नोंद व्हावी, अशी नोंद न झाल्यामुळे काही समाजकंटक भूमाफिया कडून जमीन धारकांना पैशांची मागणी करून वारंवार त्रास देत ब्लॅकमेलिंग करीत आहेत.
अशा या त्रासाला कंटाळून परवाच व्यक्ती भुरेवार या व्यापाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. नेहमी मानसिक व आर्थिक त्रास देऊन ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांमध्ये फिरोज इनामदार, अफरोज खान जब्बार खान ही व्यक्ती असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
अर्जाची दाखल घेऊन गट नंबर २६२ चा सातबारा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली असून या निवेदनावर राधे श्याम असावा, अब्दुल जब्बार, अब्दुल अजीज, अब्दुल मुबीन अ. वाहेद, अ. खादरी, गीरमाजी बुडेवाड, डॉ. बालाजी बिलवरकर, अ. खादरी, दिनेश तिवारी, डॉ. उत्तम जाधव, डॉ. सचिन हुलुरे, डॉ. बी. आर. जाधव, संतोष आलेवाड, सुभाष घटलेवार, अ. खालिद मौलाना आदींसह ५० ते ६० प्लॉट धारक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.








